
पुणे, 24 ऑगस्ट (हिं.स.) ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. प्रमाण मराठी भाषा आणि भाषाशास्त्राच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केले. डॉ. शेख यांनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. याशिवाय, आयएएस विद्यार्थ्यांना दहा वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्राचे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात तसेच ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या त्या व्याकरण सल्लागारही होत्या. मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या डॉ. अशोक केळकर सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले होते.डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने भाषा आणि व्याकरण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु