रत्नागिरी शहरात पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम
रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांविरोधात नगरपालिका प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले आहे. पालिकेच्या नुकत्याच पार पड
पदपथावरील अतिक्रमणे हटविली जात आहेत


रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांविरोधात नगरपालिका प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले आहे. पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयाची थेट अंमलबजावणी करत सोमवारपासून शहरात व्यापक अतिक्रमणमुक्ती मोहिमेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली.

या मोहिमेची सुरुवात शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरापासून करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान संभाव्य वादविवाद, तणाव आणि स्थानिक पातळीवर होणारा विरोध लक्षात घेऊन पालिकेने घटनास्थळी चोख आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पदपथ आणि मुख्य रस्ते अडवून नागरिकांच्या चालण्यात व वाहतुकीत अडथळा ठरणारी सर्व बांधकामे या मोहिमेत तातडीने हटवण्यात येत आहेत. विशेषतः वाहतुकीला मोठी अडचण ठरणार्या वर्दळीच्या ठिकाणांवरील हातगाड्यांवरही पालिका पथकाकडून थेट जप्तीची कारवाई सुरू आहे. रस्ते आणि पदपथ मोकळे करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असून, कोणत्याही दबावाला बळी न पडता ही मोहीम शहरातील इतर प्रमुख भागांतही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande