
पुणे, 24 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने ४४६२ परवडणाऱ्या घरांची सोडत जाहीर केली असून, सोमवारपासून नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या घरांची संगणकीय सोडत १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाला १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४९१ घरे, तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २९७१ घरे उपलब्ध झाली आहेत. अशा एकूण ४४६२ घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.या घरांसाठी आज दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृतीला सुरुवात झाली आहे. अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्जांची छाननी झाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रारूप यादी, तर ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ४४६२ घरांची संगणकीय सोडत काढण्यात येईल.
या सोडतीतील घरांचे ठिकाण, किंमत आणि इतर सविस्तर माहिती २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, खासगी विकासकांच्या प्रकल्पातील परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाच्या माध्यमातून अर्ज करण्याची ही शेवटची संधी ठरणार आहे. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना म्हाडाकडून काढून घेण्यात आली असून, हा निर्णय लागू होण्यापूर्वी पुणे मंडळाला उपलब्ध झालेल्या घरांचा या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु