
रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात गेले अनेक महिने आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ताबडतोब बंद व्हावी ही आग्रहाची मागणी असून त्यावर स्थानिक प्रशासन किंवा सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याने या कंपनीच्या विरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीतील शिष्टमंडळाने आज श्री. सरोदे यांची रत्नागिरीत भेट घेतली. त्यांना घडलेल्या सर्व घटनांची माहीती दिली.
ही कंपनी तत्काळ बंद व्हावी याकरिता आपली साथ मिळावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर श्री. सरोदे यांनी सर्व आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली व या लढ्यात मीदेखील सहभागी होणार असल्याचा शब्द दिला. तसेच सर्व रत्नागिरीकरांना या लढ्यासाठी आर्थिक साहकार्य करण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी