
सोलापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। सिद्धेश्वर बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याने बाजार समितीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे कांदा लिलावासाठी ४० एकर जमीन खरेदी करण्यास बाजार समितीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. आता पणन संचालकांच्या मंजुरीनंतर जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील ४५ विषयांना मंजुरी देण्यात आली. कांदा लिलावासाठी अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बोरामणी येथे ४० एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. पणन संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन महिन्यांत जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नवीन जागेमुळे कांदा लिलावासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध होऊन बाजार समितीवरील जागेचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, सोलर पॅनेल बसविणे तसेच मुख्य प्रवेशद्वारासह अन्य प्रवेशद्वारांच्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली.याशिवाय सिमेंट रस्त्यांच्या कामांची बिले अदा करणे आणि पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची बिले देण्यासही संचालक मंडळाने मंजुरी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड