
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील नव्या इमारतीमध्ये २४ ऑगस्ट रोजी झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटात ३ नवजात चिमुकल्यांचा करुण अंत झाला आहे. मात्र ज्या ‘शिल्लर’ कंपनीच्या व्हेंटिलेटरचा डफरीनमध्ये स्फोट झाला, त्याच कंपनीचे तब्बल १० हजारांपेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स सध्या राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत. या गंभीर बाबीमुळे संपूर्ण राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी डफरीन रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून ‘शिल्लर’ कंपनीच्या प्रतिनिधींची कसून चौकशी केली.या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि प्रशासकीय चौकशी उच्चस्तरीय समितीकडून होत आहे समिती घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करेल. त्यामुळे समितीच्या चौकशीअंती आणि तांत्रिक पडताळणीनंतरच व्हेंटिलेटरच्या वापराबाबतचे नेमके वास्तव आणि सत्य समोर येणार आहे.
‘त्या’ व्हेंटिलेटरला विरोध, तरीही केली खरेदी...
नव्या इमारतीतील अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) सुरू करताना तिथल्या डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘शिल्लर’ कंपनीचे व्हेंटिलेटर वापरण्यास लेखी व तोंडी तीव्र विरोध केला होता. मात्र, डॉक्टरांचा हा विरोध पायदळी तुडवून अखेर वरिष्ठ पातळीवरून त्याच वादग्रस्त कंपनीची व्हेंटिलेटर वापरण्याची सक्ती का करण्यात आली? निष्पाप चिमुकल्यांच्या जिवापेक्षा आरोग्य विभागाचे या कंपनीशी नेमके काय गूढ नाते आहे, असा सवाल आता अमरावतीकर विचारत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी