आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी चौकशी करून संबंधित प
बालविवाह


बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी चौकशी करून संबंधित पालक, नातेवाईक आणि विवाहविधी करणाऱ्या पुरोहितासह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानडी बुद्रुक येथे तीन अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधितांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ असा आहे.

पालक, नातेवाईकांसह पुरोहितावरही कारवाई

या प्रकरणात गंगाराम बाबू गायकवाड, हाउसाबाई गंगाराम गायकवाड, भिमा बाबू फुलमाळी, संगीता भिमा फुलमाळी, भिमा शंकर फुलमाळी, गजराबाई भिमा फुलमाळी, दगडू बाजीराव फुलमाळी, अलका दगडू फुलमाळी, संजय भिमा गायकवाड, विमल संजय गायकवाड, कान्हू बु-हाजी गायकवाड आणि संगीता कान्हू गायकवाड यांच्यासह विवाहविधी करणारे पुरोहित छगन विठ्ठल कुलकर्णी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

दिवसभर चर्चेनंतर अखेर गुन्हा दाखल

बालविवाहाचा प्रकार समोर आल्यानंतर मंगळवारी दिवसभर पोलीस चौकीत ग्रामसेवक, नातेवाईक आणि ग्रामस्थांची चर्चा सुरू होती. पंच हजर नसल्यामुळे पंचनामा करण्यास विलंब झाल्याचे ग्रामसेवक एम. ए. माळेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, आता पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे.

बालहक्क कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाईची मागणी

बालविवाहासारख्या गंभीर प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच विवाह लावून देण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी केली आहे. केवळ गुन्हा दाखल करून न थांबता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर प्रभावी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande