
लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.) लातूर शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध लातूर शहर वाहतूक शाखेने विशेष कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत सात बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील काही बुलेटस्वार वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने फटाका सायलेन्सर बसवून वाहने चालवत असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली.
यापुढेही अशा वाहनांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार ध्वनीपातळी मापकाच्या सहाय्याने वाहनाच्या आवाजाची पातळी तपासली जाणार आहे. नियमबाह्य सायलेन्सर बसवून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांनी तत्काळ असे सायलेन्सर काढून नियमानुसार सायलेन्सर बसवून घ्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहनामुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रत्येक वाहनचालकाने काळजी घ्यावी. फटाका सायलेन्सरचा वापर करून विनाकारण कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारचे वाहन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर जिल्हा पोलीस दलाने दिला आहे.
“वाहनाचा आवाज स्टाईल नाही, तर इतरांच्या त्रासाचे कारण आहे; नियम पाळा आणि ध्वनीप्रदूषण टाळा,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis