
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई शहरातून कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेचे कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामे पूर्ण करूनही वेळेत बिले मिळत नसल्याने तसेच बिलांसाठी वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने आपण मानसिक आणि आर्थिक तणावात असल्याची व्यथा देवकाते यांनी वर्षभरापूर्वी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रातून मांडली होती. या घटनेमुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून राज्यात खळबळ उडाली आहे.
गजानन देवकाते हे नवी मुंबईत वास्तव्यास होते. त्यांनी मुंबई महापालिकेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे काम केल्याची माहिती आहे. मात्र, काम पूर्ण करूनही त्यांचे बिल वेळेत मिळाले नसल्याने ते सातत्याने पाठपुरावा करत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून आपल्या परिस्थितीची माहिती दिली होती. काम केल्यानंतर बिल मिळवण्यासाठी दहा वेळा कार्यालयात चकरा माराव्या लागतात, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असून काम करूनही पैसे मिळत नसतील तर कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, राज्यातील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर बिले थकीत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. थकीत बिलांसाठी कंत्राटदारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून काही कंत्राटदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. सरकारकडे कंत्राटदारांची सुमारे ९० कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचा दावा केला जात आहे.
कंत्राटदाराने आत्महत्या करण्याची ही राज्यातील दुसरी घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच थकीत बिलांच्या प्रश्नावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. देवकाते यांनी वर्षभरापूर्वी पत्राद्वारे समस्या मांडूनही त्याची वेळीच दखल घेतली गेली का, याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे आगामी काळात हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही तापण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule