बदनापूरच्या विकासकामांचा आमदार कुचे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.) : पंचायत समिती, बदनापूर येथे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बदनापूर तालुक्यातील
बदनापूरच्या विकासकामांचा आमदार कुचे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा


छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.) : पंचायत समिती, बदनापूर येथे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळावा, मंजूर विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत आणि प्रशासकीय कारणांमुळे कोणतेही काम प्रलंबित राहू नये, या उद्देशाने बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी गावनिहाय सुरू असलेली विकासकामे, रस्ते व बांधकामे, कृषी विभागाच्या विविध योजना, ग्रामविकासाशी संबंधित कामे, महसूल विभागातील विषय, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीची उपलब्धता, प्रलंबित प्रस्ताव तसेच नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनामार्फत मंजूर झालेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीत कामाचा दर्जा आणि गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड करू नये. संबंधित विभागांनी कामांना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असलेल्या बाबींचा तातडीने निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना आमदार नारायण कुचे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले. शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि तत्परतेने कार्य करावे, असे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले.

बैठकीस बदनापूर तहसीलदार शंकर हंदेश्वर, पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती राठोड, मुख्याधिकारी विशाल पाटील, माजी पंचायत समिती सभापती तथा बदनापूर नगरपंचायत नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, माजी पंचायत समिती सभापती सुपडसिंग जागरवाल, माजी पंचायत समिती सभापती कैलास तात्या मदन, बदनापूर तालुका कृषी अधिकारी गोपाल गुजर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मण राऊत, नायब तहसीलदार हेमंत तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande