अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री, संबंधित अधिकारी जबाबदार - विजय वडेट्टीवार
अमरावती, 26 ऑगस्ट, (हिं.स.) | अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून माहित
बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार


अमरावती, 26 ऑगस्ट, (हिं.स.) | अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी, कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसेच, अमरावतीत नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी विजय वडेट्टीवार म्हणाले.

या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्याची माहिती आहे. तरीही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. आरोग्यमंत्री केवळ चौकशीची घोषणा करून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. या चौकशीचा अहवाल आठ दिवसांत जाहीर केलाच पाहिजे. आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवत आहे. या प्रकरणी आरोग्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

शिल्लर कंपनीचा व्हेंटिलेटर...

रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारत म्हटले, २०२२ मध्येही याच रुग्णालयात व्हेंटिलेटरशी संबंधित घटना घडली होती. त्याची चौकशी झाली. चार वर्ष त्याचा अहवाल आला नाही, कारवाई झाली नाही. २०२२मधील घटनेतही शिल्लर कंपनीचा व्हेंटिलेटर होता. सध्याच्या दुर्घटनेतही याच कंपनीच्या उपकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही व्हेंटिलेटर या रुग्णालयातून हटवली पाहिजे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या कंपनीचे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर वापरात आहेत. महाराष्ट्रातील लाखो रुग्णांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न आहे. सगळ्या रुग्णालयातूनच हे व्हेंटिलेटर हटवून नवीन व्हेंटिलेटर वापरावे याबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी करणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. हे व्हेंटिलेटर चायना मेड आहेत का? कोणाच्या दबावामुळे ही उपकरणे खरेदी केली गेली? असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

२०२२ मध्ये चौकशी झाली तरी काही बदल झाला नाही. आता या घटनेनंतर आठ दिवसात आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल जाहीर केला पाहिजे. अमरावती प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही अधिवेशनात करू. सरकारला जाब विचारू अस वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत करण्यात यावी, परिचारिकेने धाडसाने ६ बालकांचा जीव वाचवला, याची दखल घेतली पाहिजे. इतकी मोठी घटना घडल्यावर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होणार असतील तर हे अत्यंत गंभीर आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande