
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव धरणाच्या संवेदनशील व प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वपरवानगीशिवाय स्फोटकांचा वापर करून बेकायदा ब्लास्टिंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे धरणाच्या सुरक्षेला तसेच जलसंपदा विभागाच्या मालमत्तेला धोका निर्माण झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन, उपविभाग क्रमांक १७, केसापुरी वसाहत येथील सहायक अभियंता शीतल जानकीराम माने यांनी याबाबत फिर्याद दिली. माजलगाव नगरपरिषदेअंतर्गत धरण क्षेत्रात विहिरीचे काम सुरू असताना अचानक जोरदार स्फोटाचा आवाज झाला. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी सुमारे २६ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असा मोठा खड्डा पडल्याचे आढळून आले. धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रापासून अवघ्या २०० मीटरच्या आत हा स्फोट घडवून आणण्यात आल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (ब) तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम १०७ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश श्रीधर नगरे करीत आहेत.
धरणासारख्या संवेदनशील ठिकाणी परवानगीशिवाय स्फोटकांचा वापर झाल्याने या घटनेची गांभीर्याने चौकशी होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis