लातूर - रेणापूर येथे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येण्याची मागणी
लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्याच्या राजकीय इतिहासात रेणापूरला विशेष स्थान असून या भूमीशी जिव्हाळ्याचे नाते असलेले लोकनेते विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पंचायत समिती, रेणापूरच्या प्रांगणात दोन्ही नेत
निवेदनाद्वारे मागणी


लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्याच्या राजकीय इतिहासात रेणापूरला विशेष स्थान असून या भूमीशी जिव्हाळ्याचे नाते असलेले लोकनेते विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पंचायत समिती, रेणापूरच्या प्रांगणात दोन्ही नेत्यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे रेणापूर तालुकाध्यक्ष हणमंतराव पवार यांनी पंचायत समितीच्या सभापती मोनिका सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

रेणापूरच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या वाटचालीत लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या वाटचालीशी रेणापूरचे नाव जोडलेले आहे. येथून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्याचप्रमाणे लोकनेते विलासराव देशमुख यांनीही रेणापूर परिसराच्या

विकासासाठी विविध योजना, निधी व प्रकल्पांच्या माध्यमातून योगदान दिले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या दोन्ही नेत्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्वतंत्र स्मारकांऐवजी पंचायत समितीच्या प्रांगणात एकाच ठिकाणी दोन्ही नेत्यांचे पुतळे असलेले संयुक्त व स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे स्मारक केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता दोन्ही नेत्यांचे जीवनकार्य, राजकीय प्रवास, रेणापूरच्या विकासातील योगदान आणि ऐतिहासिक आठवणी जतन करणारे प्रेरणास्थळ म्हणून विकसित करावे, अशीही मागणी आहे. पंचायत समितीच्या आगामी मासिक बैठकीत अधिकृत ठराव मंजूर करून संयुक्त स्मारकाचा प्रस्ताव जिल्हा परिषद, लातूर यांच्याकडे तातडीने पाठवावा. तसेच स्मारकासाठी आवश्यक जागा, प्रशासकीय मान्यता, निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. रेणापूरच्या इतिहासास सन्मान देणारे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे हे संयुक्त स्मारक उभारणे ही दोन्ही लोकनेत्यांना खरी व चिरंतन आदरांजली ठरेल, असा विश्वास हणमंत पवार यांनी व्यक्त केला. सदर निवेदनाच्या प्रती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे व माजी आमदार धीरज देशमुख यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande