
रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरातील स्थानिक युवक-युवतींच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिकांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक रोजगारासाठी सुरू असलेल्या लढ्याला विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी ठाम पाठिंबा देत, आगामी आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी होतील. खालापूरमधून ५० हजार युवकांची फौज उभी करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कर्जत-मुरबाड मार्गावरील मुद्रे येथील रॉयल गार्डनमध्ये आयोजित बैठकीत तटकरे बोलत होते. यावेळी कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर भूमिका मांडताना तटकरे यांनी, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मुलांना रोजगाराची संधी मिळणार नाही का, असा सवाल उपस्थित केला. उद्योग उभारणीसाठी स्थानिकांच्या जमिनी, संसाधने आणि परिसराचा वापर होत असताना रोजगाराच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना योग्य प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार घेऊन स्थानिक युवक-युवती संघटित होत असून, आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्यास ते सज्ज असल्याचे तटकरे म्हणाले. टाटा, बिर्ला, महिंद्रा आणि रिलायन्स यांसारख्या उद्योगसमूहांनी देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे आपली भूमिका उद्योगविरोधी नसून स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या कंपनीच्या कारभारामुळे स्थानिकांवर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिकांना रोजगार देताना शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्थानिक युवकांनीही उद्योगांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिस्त, नियमितपणा आणि कामाची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. युवकांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि समाजाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुधाकर भाऊ घारे यांनी सुरू केलेल्या स्थानिक रोजगाराच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सहकार्य करतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. आगामी काळात स्थानिक रोजगाराचा प्रश्न अधिक तीव्रतेने मांडण्याचा आणि आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी भगवान भोईर, मसूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)