
वर्धा, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्हा रुग्णालय, सावंगी आणि सेवाग्राम अशी मोठी रुग्णालय जिल्ह्यात असली तरी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या तब्बल ८२ रुग्णालयाची नोंद जिल्ह्यात आहे. या रुग्णालयात भौतिक सुविधा असल्या तरी आरोग्य सुविधांबाबत मात्र चांगलीच ढिलाई असल्याचे पुढे आले आहे. येथे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या किंवा कमी पगारात काम करणाऱ्या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच आरोग्य सेवा आहे.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (एनआयसीयू) सोमवारी (ता. २४) मध्यरात्री व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत तीन नवजात शिशुंचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून शासकीय रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला असता, एकीकडे जिल्ह्यातील एकूण ८२ खासगी रुग्णालयांनी (यात बालरुग्णालयांचाही समावेश आहे) सुरक्षिततेचे नियम पाळले असून, दुसरीकडे मुख्य शासकीय रुग्णालयच अग्निशामक दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’विना सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ नुसार कोणत्याही खासगी रुग्णालय किंवा बालरुग्णालयाला वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी आपल्या नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असते. या कायद्यातील तरतुदींनुसार रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय नोंदणीचे नूतनीकरण होत नाही, शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी मान्यताप्राप्त वायरमन किंवा एजन्सीकडून दरवर्षी इलेक्ट्रीक स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे, रुग्णालयात केवळ प्रशिक्षित आणि नोंदणीकृत परिचारिका असणे बंधनकारक आहे.मात्र, नियमांचा हा बडगा केवळ कागदावरच असल्याचे दिसते.
बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ८२ खासगी रुग्णालयांनी आपले फायर व इलेक्ट्रीक ऑडिट प्राधान्याने पूर्ण करून नगर परिषदेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळवली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आम्ही तत्काळ परवाना रद्द करण्याची कारवाई करतो. मात्र, शासकीय रुग्णालयांकडून या बाबीकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. -अशोक लोखंडे, अग्निशमक विभाग, नगरपालिका, वर्धा.
------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी