
नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। परळी वैजनाथ शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी परळी नगरपरिषद मार्फत शहरातील जलकुंभांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुरू करण्यात आलेल्या या कामांची नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती जयश्री रविंद्र गित्ते, मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याला नगरपरिषदेने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जलकुंभांच्या दुरुस्ती व सुधारणेची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.जल कुंभांची परिपूर्ण दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये जलकुंभामधील गाळ काढणे,आतून प्लास्टर, कलर ,नविन वॉल, फॅब्रिकेशनच्या शिडी भेगा भरणे व काँक्रीट दुरुस्ती,गंजलेले स्टील दुरुस्त करणे, छत/भिंतींचे मजबुतीकरण, जल कुंभार लिकेज थांबवण्यासाठी केमिकल कोटिंग,आतील बाजूस फूड-ग्रेड वॉटरप्रूफिंग, क्लोरीनेशन करून निर्जंतुकीकरण, इनलेट/आउटलेट पाइप तपासणी,व्हॉल्व्ह, फ्लोट व्हॉल्व्ह बदलणे,बाहेरील रंगकाम सुरक्षा रेलिंग, जिने दुरुस्ती तसेच आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या केला जाणार आहेत.
विविध जल कुंभांच्या दुरुस्त्यांच्या सुरू असलेल्या या कामांची नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती जयश्री रविंद्र गित्ते, मुख्याधिकारी पी. एन. निगळ तसेच नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.अनेक वर्षांनंतर जलकुंभांची ही देखभाल-दुरुस्ती होत असून, शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याची ग्वाही पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis