
वर्धा, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक नियमासाठी दुभाजक उभारण्यात आले. मात्र, या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले नसल्याने शहरातील हिरवाई वाढविण्याची संधी दुर्लक्षित राहिली होती. याच बाबीची दखल घेत माजी प्रभारी सरपंच मिलिंद गजभिये यांनी पुढाकार घेत दुभाजकांवर वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रस्ते बांधताना दुभाजक उभारण्यात आले, मात्र त्यामध्ये वृक्षारोपण नसेल तर या जागेचा पर्यावरणपूरक उपयोग कसा होईल, असा प्रश्न उपस्थित होत होता. या विचारातून गजभिये यांनी स्वतः पुढाकार घेत दुभाजकांमध्ये कोरफड, सदाफुली आदी रोपांची लागवड करण्यास सुरवात केली आहे. येत्या काळात उपलब्ध जागेनुसार आणखी रोपे लावण्याचा त्यांचा मानस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर हिरवाई निर्माण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून पुढाकाराची अपेक्षा न करता नागरिकांनी स्वतःहून पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून मिळत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, रोपांचे संगोपन आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारल्यास शहर अधिक सुंदर व हिरवेगार होऊ शकते. गजभिये यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, दुभाजकांवरील रोपांचे नियमित संगोपन करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे
प्रशासनाला लाजवेल असा उपक्रम दुभाजक उभारल्यानंतर त्यामध्ये वृक्षारोपण करण्याकडे दुर्लक्ष झाले असताना गजभिये यांनी स्वतः पुढाकार घेत रोपांची लागवड सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमातून ‘केवळ अपेक्षा न करता कृती करावी’ हा संदेश मिळत असून, शहरातील इतर नागरिकांनीही अशा उपक्रमासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी