
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधून कोरे ठराव मंजूर करून गैरमार्गाने मतदार यादी तयार केली जात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे.
या प्रकारांची सखोल चौकशी करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याकरिता ठराव पाठविण्याची प्रक्रिया गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. पाच हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या या बँकेवर स्थापनेपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांतील कामगिरीनंतर भाजपने बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे या राजकीय हालचालींमध्ये सक्रिय असल्याचे मानले जाते.
त्यामुळे आगामी डीसीसी निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी राजकीय गटांसाठी प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचेच आमदार सुभाष देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात भूमिका घेत थेट पुणे विभागीय सहनिबंधकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही संस्थांमध्ये संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर सह्या घेणे, तसेच कार्यालयाबाहेर नियमबाह्य पद्धतीने ठराव करण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड