
नाशिक, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
:शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पाच जिल्ह्यांतील शिक्षणाधिकार्यांना पोलिस प्रशासनाने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, काही शिक्षणाधिकारी तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप पोलिस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तपासात सहकार्य न करणार्या अधिकार्यांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला.
शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नियुक्त्या, वेतन तसेच शासनाच्या विविध सुविधांशी संबंधित अनियमितता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी संबंधित जिल्ह्यांतील शिक्षणाधिकार्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र, चौकशीदरम्यान काही अधिकारी आवश्यक ते सहकार्य करीत नसल्याचे पोलिस प्रशासनाने निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत विचारले असता दादा भुसे यांनी शासनाचा तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसून, दोषी आढळणार्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तपास यंत्रणेला आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देणे ही संबंधित अधिकार्यांची जबाबदारी आहे. तपासात अडथळा निर्माण करणार्या किंवा सहकार्य न करणार्या अधिकार्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही भुसे यांनी सांगितले.
शालार्थ आयडी घोटाळ्यात नेमकी कोणाची भूमिका आहे, याचा तपास सुरू असून, तपासातून समोर येणार्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
असुविधांबाबत माहिती द्यावी
शाळांमधील असुविधांबाबत तक्रारी असल्यास संबंधित शालेय समितीकडे तक्रार करावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले. ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या काही तरुणांनी आपल्या निवासस्थानी येऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना शाळांची स्वच्छता, इमारतीची अवस्था किंवा अन्य सुविधांबाबत काही सूचना असतील तर त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. सूचनांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, शाळेत जाताना कॅमेरे घेऊन गर्दी करणे आणि जाणूनबुजून दुसर्या शाळेतील विद्यार्थी बसवून वेगळे चित्र निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची फाईल तपासणीसाठी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश लवकरच
विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या दुसर्या गणवेशाचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. पहिल्या गणवेशासाठीचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला होता. त्यानुसार बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला असून, काही शाळा वगळता सर्वत्र गणवेशाचे वाटप झाले आहे. गणवेशाचा दर्जा चांगला आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे.
महिन्याभरात 30 हजार शिक्षकांची भरती
राज्यातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी येत्या महिनाभरात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून, शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे, हा सरकारचा उद्देश असून, खासगी क्लासेसपेक्षा शाळांकडे अधिक लक्ष देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशिष्ट दुकानातून साहित्य घेण्याची सक्ती नाही
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतचा कायदा सर्व शाळांना लागू आहे. एखाद्या शाळेकडून विशिष्ट दुकानातून साहित्य घेण्याची सक्ती होत असल्याची पालकांनी तक्रार केल्यास त्याची चौकशी करण्यात येईल असे मंत्री भुसे म्हणाले.
टिपू सुलतानचा फोटो काढायला लावणार
मालेगावच्या महापालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांनी कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईन आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.
13 वर्षांपर्यंत मुलांना खासगी क्लासेस बंद
विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने खासगी शिकवणी केंद्रांवर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे. 13 वर्षांखालील मुलांना खासगी क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, अशी महत्त्वाची तरतूद प्रस्तावित नियमावलीत करण्यात आली आहे. खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी तयार करण्यात आलेले प्रारूप जनतेच्या सूचना व हरकतींसाठी खुले करण्यात आले आहे. 4 सप्टेंबरपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त सूचनांनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. शाळा किंवा महाविद्यालयाच्या आवारात खासगी क्लासेस चालविता येणार नाहीत. शाळेच्या वेळेत खासगी शिकवणी घेण्यासही मनाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने क्लासेससाठी पुरेशी व सुटसुटीत जागा, तसेच स्वच्छतागृहाची सुविधा असणे आवश्यक राहणार आहे.
प्रस्तावित नियमावलीनुसार एका दिवसात जास्तीत जास्त पाच तास खासगी शिकवणी घेता येणार आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्या किंवा फसव्या स्वरूपाच्या जाहिरातींवरही निर्बंध आणले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI