
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असतानाच आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय वातावरण चांगलेच तापले. चौकशी समितीची बैठक सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.दरम्यान, उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष तथा आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्यासोबत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.विशेषतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार तसेच संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सुषमा अंधारे व ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था, उपकरणांची देखभाल, फायर ऑडिट तसेच प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.तीन निष्पाप नवजात बालकांचा जीव गेल्यानंतरही केवळ चौकशीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता दोषींवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ठाकरे सेनेकडून मांडण्यात आली. त्यामुळे चौकशी समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय वातावरण चांगलेच तापले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी