
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
एकीकडे आगीच्या भीषण ज्वाला आणि दुसरीकडे निष्पाप चिमुकल्यांचा आक्रोश... अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मृत्यूच्या तांडवात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील ३ परिचारिका आणि एका कर्मचाऱ्याच्या धाडसाचा बुधवारी (ता.२६) अश्रूंच्या आणि कौतुकांच्या वर्षावात सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या 'रिअल लाईफ हिरोंना' प्रत्येकी ५० हजार रुपयांची रोख रक्कम देऊन त्यांच्या असीम धैर्याची दखल घेण्यात आली.
ज्या वेळी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते, त्यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून या कर्मचाऱ्यांनी आगीत धाव घेतली आणि त्या चिमुकल्यांना काळजाशी कवटाळून बाहेर काढले. त्यांच्या या अविश्वसनीय शौर्याची आणि माणुसकीची दखल घेत भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अत्यंत भावूक वातावरणात या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. रुग्णालयातील या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपची शहरातील ऐतिहासिक दहीहंडी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.या सन्मान सोहळ्याला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, चेतन गावंडे, चेतन पवार, आरती वानखडे, छायाताई दंडाळे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे महामंत्री सलीम घाणीवाले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दुःखाच्या प्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. चिमुकल्या बालगोपालांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणूनच आम्ही यावर्षीची दहीहंडी रद्द करून मृत बालकांचे कुटुंबीय आणि जखमींच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण भाजप परिवार या दुःखाच्या प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.— प्रवीण पोटे पाटील (आमदार)
या भयंकर घटनेत परिचारिका आणि ब्रदर्स यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा परिचय देत अतुलनीय धाडसाचे काम केले. त्यांच्या या शौर्याचा आणि समर्पणाचा सन्मान होणे अतिशय आवश्यक होते. त्यासाठी भाजपने पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.जखमी झालेल्या मुलांना व त्यांच्या नातेवाईकांनाही आम्ही पूर्ण क्षमतेने मदत करणार आहोत.
— डॉ. अनिल बोंडे (खासदार)
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी