
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
ऑरीक-बीडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी खोडेगाव, गाडीवाट, घारदोन तांडा, घारदोन, नीलजगाव आणि पाडळी या सहा गावांतील बागायती व सुपीक जमीन संपादित करण्याच्या हालचालींबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृह येथे शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार विलास भुमरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. संबंधित गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांनी जमीन संपादनास स्पष्ट विरोध दर्शविला असून, शेती हीच अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने सुपीक जमीन गेल्यास मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर अन्याय करून विकास होता कामा नये. प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, ग्रामसभेतील भूमिका आणि स्थानिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा, ही माझी ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्या हक्कांसाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रयत्न करण्यासाठी मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहीन.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis