सोलापूर वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे; आवाजही होणार रेकॉर्ड
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना अधिक पारदर्शकता राहावी आणि पोलिस व वाहनचालकांमधील संवादाची नोंद व्हावी, यासाठी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्य
Cp


सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना अधिक पारदर्शकता राहावी आणि पोलिस व वाहनचालकांमधील संवादाची नोंद व्हावी, यासाठी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये व्हिडिओसोबतच आवाजाचेही रेकॉर्डिंग होणार आहे.

सोलापूर शहरातील उत्तर आणि दक्षिण वाहतूक विभागातील प्रत्येकी २५ अंमलदारांना हे कॅमेरे देण्यात आले आहेत. यापूर्वीही वाहतूक पोलिसांसाठी ५० बॉडी वॉर्न कॅमेरे खरेदी करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांत त्यांचा वापर बंद झाला होता. आता जुन्या कॅमेऱ्यांची संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून दुरुस्ती करण्यात येत असून, ते पुन्हा वापरात आणले जाणार आहेत.

या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक कारवाईदरम्यान पोलिस आणि वाहनचालकांमध्ये झालेला नेमका संवाद वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऐकता आणि पाहता येणार आहे. त्यामुळे पोलिसांवर करण्यात येणारे आरोप खरे की खोटे, याची वस्तुस्थिती तपासण्यास मदत होणार आहे. कारवाईची नोंद उपलब्ध राहिल्याने दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी करणेही सुलभ होणार आहे.

अरेरावी केल्यास गुन्हा दाखल होणार

दरम्यान, वाहतूक कारवाईदरम्यान वाहनचालकाने पोलिसांशी हुज्जत घातली किंवा अरेरावी केली, तर संबंधिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा सहायक पोलिस आयुक्त मनोज यादव यांनी दिला आहे.

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande