
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात वाद पुन्हा एकदा समोर आला असून, राज्यसभा सदस्य तथा भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या वडिलांना अवाच्च शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोर्शी तालुक्यातील येरला येथील सुनील विठ्ठलराव सोमवंशी यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांनी एका वृत्तवाहिनीवर जाहीरपणे डॉ. अनिल बोंडे यांच्या वडिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराने या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे सांगितले असून, डॉ.अनिल बोंडे यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचीही भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पराग गुडधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी