
बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
लातूर रोडवरील साईनाथ स्मार्टसिटी परिसरात घरासमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनाथ स्मार्टसिटी, लातूर रोड येथील रहिवासी वजनकाटे व्यावसायिक जोतीराम पांडुरंग भिसे (वय ४५ वर्ष) यांनी बँक ऑफ इंडियाच्या अंबाजोगाई शाखेतून दोन लाख रुपये रोख काढले होते. ही रक्कम पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवून त्यांनी ती कारमध्ये डाव्या बाजूच्या सीटवर ठेवली. त्यानंतर घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये कार पार्क करून ते जेवणासाठी घरात गेले. काही वेळाने खाली येऊन पाहिले असता कारच्या पुढच्या डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फुटलेली आढळली आणि आतील पैशांची पिशवी गायब होती.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कारची काच फोडून पैशांची पिशवी पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. यात कारचे अंदाजे दहा हजारांचे नुकसानही झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३२४(१) अन्वये गुन्हा नोंदवला गेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पिराजी व्यंकटी गुट्टे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis