
धुळे,, 29 ऑगस्ट (हिं.स.) नरडाणा गावातअज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) एटीएमवर धाडसी दरोडा टाकत एटीएम फोडून त्यातील रोकडपेटी घेऊन पलायन केले. या यंत्रात जवळपास अकरा लाख रुपयांची रोकड होती, अशी प्राथमिक माहीती असून पोलिसांकडून मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमुळे नरडाणा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नरडाणा गावातील एका व्यापारी संकुलात असलेल्या मधुकर एसबीआयच्या एटीएम केंद्रात शनिवारी (दि. २९) पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड असलेला कॅश बॉक्स उचलून एका वाहनातून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच उपलब्ध होत असल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एटीएममधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली, याबाबत बँकेकडून माहिती संकलित केली जात असून पंचनामा आणि तपासानंतरच नुकसानाची अचूक रक्कम स्पष्ट होणार आहे. या धाडसी चोरीमुळे नरडाणा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नरडाणा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर