
परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची क्रेटा कारमधून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा ५ लाख ६३ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ११ लाख रुपये किमतीची क्रेटा कार, असा एकूण १६ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगाखेड विभागाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून अवैधरित्या गुटखा वाहतूक करून तो कोळवाडी गावाच्या दिशेने नेण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित क्रेटा कार थांबविली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विमल, राजनिवास, डायरेक्टर आणि रजनीगंधा कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी ५ लाख ६३ हजार रुपये किमतीचा गुटखा तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली ११ लाख रुपये किमतीची क्रेटा कार असा एकूण १६ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी जप्त मुद्देमाल पालम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis