
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। दरोडेखोरांच्या टोळक्याने भयंकर थरार घडवून आणला. लुटारूंनी छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब जात असलेल्या धावत्या वाहनांच्या मार्गात खिळे व धारदार लोखंडी वस्तू टाकून टायर पंक्चर केले आणि लाखो रुपयांची लुटालूट केली.
दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या महामार्गावरील धुमाकूळात ३ वाहनांना लक्ष्य करण्यात आले असून पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब कारने मुंबईच्या दिशेने जात होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे कारचे टायर फुटले. गाडी थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने वाहनाला चारी बाजूंनी वेढा घातला. लुटारूंनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या भीषण दहशतीमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis