
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा, पाच बीएलओ निलंबित
नवी मुंबई, 29 ऑगस्ट (हिं.स.)। नवी मुंबईतील खारघर परिसरात मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित एसआयआर एन्युमरेशन फॉर्म मोठ्या संख्येने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खारघर पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सूरज पाटील यांच्याविरोधात सरकारी फॉर्म बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणे आणि त्यांचा वैयक्तिक वापर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. एका झेरॉक्स दुकानातून तब्बल ३ हजार ४०४ एसआयआर फॉर्म पोलिसांनी जप्त केले असून, त्यामध्ये ११ मतदान केंद्रांशी संबंधित ११ कोरे फॉर्मचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काम करणाऱ्या एका वकिलाला खारघरमधील झेरॉक्स दुकानात मूळ एसआयआर फॉर्म आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकानाची तपासणी केली. या कारवाईदरम्यान हजारो छापील एसआयआर फॉर्म पोलिसांच्या हाती लागले. या फॉर्मचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने केला जात होता, तसेच ते दुकानापर्यंत कसे पोहोचले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयआर फॉर्मची (झेरॉक्स) छायांकित प्रत काढण्यासाठी सूरज पाटील दुकानात आल्याचे समोर आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. मात्र, पोलिस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच तो तेथून निसटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या दाव्याचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पाच बूथ लेव्हल ऑफिसर्स म्हणजेच बीएलओंना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एका खासगी कंपनीतील तीन डेटा एन्ट्री ऑपरेटरचाही समावेश आहे. हे ऑपरेटर बीएलओ म्हणून काम पाहत होते. त्यामुळे एसआयआर फॉर्मच्या वितरणापासून ते झेरॉक्स दुकानापर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी आता प्रशासन आणि पोलिसांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule