चंद्रभागा नदी इशारा पातळीपार; पंढरपुरात पूरस्थितीचा इशारा
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. चंद्रभागा नदीपात्रातून सुमारे १ लाख ८ हजार क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू असून नदीने इशारा पा
Wari


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. चंद्रभागा नदीपात्रातून सुमारे १ लाख ८ हजार क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने रायगड भवन येथे नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे. तसेच बाधित नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू स्थलांतरित करण्यासाठी अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नगराध्यक्षा प्रणिती भालके आणि उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande