
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील गर्दीच्या वेळेत (पिक अवर्स) वाहतूक नियमांचे उल्लंघन करून प्रमुख रस्त्यांवर धोकादायकपणे धावणाऱ्या अवजड वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरएमसी मिक्सर, डंपर आणि ट्रॅक्टर चालकांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांच्या प्रवेशावर ठराविक वेळेत निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून आरएमसी मिक्सर, डंपर आणि इतर जड वाहने सर्रास शहरातील मुख्य रस्त्यांवर धावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कारवाईचा बडगा उगारला आहे. वानवडी, मुंढवा, डेक्कन, लष्कर, भारती विद्यापीठ आणि बोपोडी वाहतूक विभागाच्या हद्दीत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वानवडी वाहतूक विभागाने भैरोबानाला आणि गोळीबार चौक परिसरात सहा आरएमसी मिक्सर व डंपर चालकांवर कारवाई केली. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. लष्कर पोलिसांनी इंदिरा गांधी चौकात एका आरएमसी मिक्सर चालकावर कारवाई केली. तसेच मुंढवा चौक ते ताडीगुत्ता चौक या गर्दीच्या मार्गावर मनाई असतानाही मालकाच्या सूचनेनुसार वाहने चालवणाऱ्या तीन मिक्सर चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला असून, वाहनचालकांनी मनाई आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु