विष्णोराच्या पाण्याच्या टाकीतून निघाला भला मोठा नाग!
- बनावट सर्पमित्राचा खेळ पाहून नागरिक हादरले अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.) विष्णोरा गावातील (ता. मोर्शी) जीर्ण झालेली पाण्याची टाकी पडली असून तेथील साफसफाई सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाकीच्या ढिगाऱ्यातून भला मोठा नाग निघाल्याने
विष्णोराच्या पाण्याच्या टाकीतून निघाला भला मोठा नाग!


- बनावट सर्पमित्राचा खेळ पाहून नागरिक हादरले

अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)

विष्णोरा गावातील (ता. मोर्शी) जीर्ण झालेली पाण्याची टाकी पडली असून तेथील साफसफाई सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाकीच्या ढिगाऱ्यातून भला मोठा नाग निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक असलेली विष्णोरा गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतीने जमीनदोस्त केली होती. त्याची साफसफाई सुरू असताना मजुरांना त्या ढिगाऱ्यातून एक मोठा नाग दिसला. नागाला पाहताच काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ धामणगाव काटपुर येथील इंगळे नावाच्या कथित सर्पमित्रांना फोन करून बोलावले. परंतु आलेला सर्पमित्र कोणतेही सुरक्षा साधन न बाळगता ना हात हुक, ना बॅग, ना बूट - थेट हाताने साप पकडू लागला. इतकेच नाही तर नागाला पकडल्यानंतर त्याचा खेळ करून दाखवला. तज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे चिथावल्यामुळे नाग चौथाळला असता आणि त्याने दंश केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. एका चाव्यात जीव जाऊ शकतो. आम्ही मदतीसाठी फोन केला, पण हा माणूस आमचाच जीव धोक्यात घालत होता अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. गावकऱ्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, असे प्रशिक्षण नसलेले आणि सुरक्षेचे नियम न पाळणारे बनावट सर्पमित्रांवर तात्काळ कारवाई करावी. साप पकडण्यासाठी फक्त प्रमाणित सर्पमित्रांनाच बोलवावे. साप दिसल्यास त्याला मारू नका किंवा स्वतः पकडू नका. तात्काळ 1926 वनविभाग हेल्पलाइन किंवा अधिकृत सर्पमित्राला संपर्क करा. असे आव्हान मोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande