
लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) रंगरूट प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत सुमारे २ हजार रोपांची लागवड करण्यात आली.
लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींची फळझाडे, सावली देणारे वृक्ष तसेच विविध औषधी वनस्पतींचा समावेश होता.
यावेळी अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना अमीरुल हसन अंसारी म्हणाले की, आपण केवळ राष्ट्राच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही कटिबद्ध आहोत. आज लावलेली झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरतील.
या कार्यक्रमाला कमांडंट पारसनाथ, राजपत्रित अधिकारी, जवान तसेच सुमारे १ हजार ७०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली.
यापूर्वीही सीआरपीएफ आरटीसी, लातूर यांच्या वतीने कॅम्प परिसर तसेच आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर विविध पक्षी आणि वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास म्हणून विकसित होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis