भीमा-नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहाने १५ हून अधिक बंधारे पाण्याखाली; सीमावर्ती भागाचा कर्नाटकशी तुटला संपर्क
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी आणि वीर धरणातून भीमा व नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापूरी पद्धतीचे २३ पैकी १५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट ताल
भीमा-नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहाने १५ हून अधिक बंधारे पाण्याखाली; सीमावर्ती भागाचा कर्नाटकशी तुटला संपर्क


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी आणि वीर धरणातून भीमा व नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापूरी पद्धतीचे २३ पैकी १५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागाचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या शेतांमध्येही पाणी शिरले आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, वीर धरणही शंभर टक्के भरले आहे. धरणांतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीर धरणातून सुमारे ६४ हजार क्युसेक आणि उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नीरा नदीतील पाणी भीमा नदीला मिळाल्यानंतर वाढलेला प्रवाह रविवारी पहाटे चंद्रभागा नदीत पोहोचला. त्यामुळे चंद्रभागा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून पंढरपूरसह नदीकाठच्या सखल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरणाच्या खालील प्रवाहात महाराष्ट्राच्या हद्दीत भीमा नदीवर एकूण २३ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यापैकी सुमारे १५ बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने अनेक अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. परिणामी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती गावांचा कर्नाटकशी संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे.

दरम्यान, भीमा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात न जाण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande