
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात कौतुक केले. तडवळकर यांचा मजबूत शहराध्यक्ष असा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेतली.
सोलापूर दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेत पालकमंत्री गोरे यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर भाजपच्या स्थानिक राजकारणात या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तडवळकर यांनी केलेल्या कार्याची दखल वरिष्ठ नेतृत्वाने घेतल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात येत होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यानंतर त्या टीकेला उत्तर मिळाल्याची प्रतिक्रिया काही भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पालकमंत्री गोरे यांच्या वक्तव्यामुळे शहर भाजपमधील संघटनात्मक घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड