
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुननगर परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला.मृताचे नाव विरल जसपारा (रा. बुटी प्लॉट, राजापेठ) असे आहे. तो एमएच 20 बीवाय 2328 क्रमांकाच्या चारचाकी वाहनात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या.घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक माहितीनुसार श्वास रोखल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.या प्रकरणी गाडगेनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी