
चंद्रपूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. स्थानिक राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुल रोड, चंद्रपूर येथे दिवसभर पार पडलेल्या या शिबिरात १,४५६ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात सर्वसाधारण रोग निदान, नेत्ररोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी,जनजागृती, विविध रक्त तपासण्या, मोफत औषध वितरण तसेच आवश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवांचा लाभ घेतला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), इंडियन डेंटल असोसिएशन (IDA), जिल्हा आरोग्य विभाग, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि सुधीरभाऊ मित्र परिवार, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी चंद्रपूरच्या प्रथम नागरिक तथा महापौर संगीता खांडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिव डॉ. ऋजुता मुंदडा, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पंकज कावळे, डॉ. अश्विन रडके, डॉ. रवी आलूरवार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. प्रविण पंत, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक रवी लोणकर, प्रज्वलन कडू, जयश्री जुमडे, सविता सरकार, डॉ. ललित पटले, डॉ. कामरान, सागर खडसे मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव