अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात 57 हजार 689 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि काही भागांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता
आठ तालुक्यातील ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ४० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, शेतकरी पुन्हा संकटात, पंचनाम्याचे आदेश


अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि काही भागांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता अतिवृष्टीचे दुहेरी संकट कोसळले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील 419 गावांतील 57 हजार 689 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि धान या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये अद्याप पाणी साचले असून उभी पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. अवघ्या दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 76 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 40 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सर्वाधिक फटका

तालुकानिहाय नुकसानीचा विचार करता नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील 109 गावांमधील 31 हजार 151 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस आणि तुरीची पिके बाधित झाली आहेत.

त्यानंतर:

मोर्शी तालुका – 85 गावांतील 19 हजार 506 हेक्टर क्षेत्र

भातकुली तालुका – 115 गावांतील 4 हजार 521 हेक्टर क्षेत्र

धामणगाव रेल्वे तालुका – 75 गावांतील 2 हजार 138 हेक्टर क्षेत्र

याशिवाय धारणी तालुक्यात 135.40 हेक्टर,

चांदूर रेल्वे तालुक्यात 234 हेक्टर,

चिखलदरा तालुक्यात 3 हेक्टर

अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1.40 हेक्टर क्षेत्रावरील

पिकांचे नुकसान झाले आहे.

21 महसूल मंडळांत 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती आणि भातकुली या पाच तालुक्यांतील 21 महसूल मंडळांमध्ये 24 तासांत 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, नदी-नाल्यांना पूर आला आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

भातकुली तालुक्यात गत गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने विशेष नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील 8 गावांतील 42 घरांची पडझड झाली असून 115 गावांतील 4 हजार 521 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

पंचनामे करून मदतीची मागणी

प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावतीसह विदर्भात पुढील तीन ते चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना शेतातील पाण्याचा निचरा करण्यासह आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande