
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्ते आणि सभासदांना बँकेचे हित जपण्याचे आवाहन केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राची संपत्ती आहे. ही बँक लुटणाऱ्यांच्या हाती पुन्हा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे सोलापूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय गटांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, बँकेवरील वर्चस्वासाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री गोरे यांच्या वक्तव्यानंतर आगामी निवडणुकीला अधिक राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारांची निवड, संभाव्य आघाड्या आणि प्रचाराची रणनीती यावर विविध गटांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड