मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी सक्षम व्हावा : जयकुमार गोरे
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी आणि सर्वसामान्यांची बँक असून, तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. बँक सातत्याने नफ्यात राहून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत त
grdf


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी आणि सर्वसामान्यांची बँक असून, तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. बँक सातत्याने नफ्यात राहून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यरत राहावी, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या ९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह जिल्हा दूध संघ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सहकारी संस्थांनी विश्वस्त भावनेतून काम केल्यास त्या अधिक प्रगती करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना कृषी कर्ज वेळेत आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याचा गौरव करताना, ते समाजहिताची जाणीव असलेले आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारे लोकप्रतिनिधी असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, माजी आमदार राम सातपुते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande