
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या २७९ व्या पालखी सोहळ्याचे सोमवारी पुणे जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये पाडेगाव (जि. सातारा) ते वाल्हे (जि. पुणे) हा परतीच्या वारीतील सर्वांत कमी अंतराचा टप्पा उत्साहात पार पडला.
परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. त्यानंतर शेकडो वारकऱ्यांनी पादुकांचे भावपूर्ण दर्शन घेतले. सकाळी सुमारे सव्वानऊच्या सुमारास पालखी सोहळ्याने नीरा शहरात प्रवेश करताच भाविकांनी फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि जयघोषात माऊलींचे स्वागत केले.
पालखीतळ, छत्रपती शिवाजी चौक आणि अहिल्याबाई होळकर चौक येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. येथील युवकांनी पालखी खांद्यावर घेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेली. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळा प्रमुखांचे स्वागत केले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी माऊलींच्या पादुकांवर मस्तक टेकवत दर्शन घेतले. यंदा दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.
वारकऱ्यांच्या भोजनासाठी सोमेश्वर साखर कारखान्याच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि संचालक जितेंद्र निगडे यांनी माऊलींचे दर्शन घेत सोहळा प्रमुखांची भेट घेतली.
दुपारी पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्थ झाला. पुढील प्रवासातही वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु