
कर्मचारी संघटनेकडून भेदभावाचा आरोप
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : शासनाच्या निर्देशानुसार सलग पाच वर्षे एकाच कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे बंधनकारक असतानाही अमरावती जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्ये या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी युनीयनने केला आहे. बदली प्रक्रियेत प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याचा आरोप करत संघटनेने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, या मुद्द्यावर कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 मे 2014 च्या शासननिर्णयानुसार एकाच कार्यालयात सलग पाच वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन बदली करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी 10 जुलैपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र, अनेक पंचायत समित्यांमध्ये या आदेशांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी सिंचन उपविभागात वरिष्ठ सहायकाची पदे उपलब्ध नसल्याचे कारण देत बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना त्याच कार्यालयात कायम ठेवण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आकृतिबंधात पदे कमी झाल्याचे कारण पुढे करून बदली प्रक्रिया टाळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, समान निकष लागू असतानाही काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर अनेक पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या. या निवडक पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाने पारदर्शक आणि समान निकषांवर बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी युनीयनने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बदली प्रक्रिया सुरळीत व न्याय्य पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
कर्मचारी संघटनेची भूमिकायाबाबत जिल्हा परिषद कर्मचारी युनीयन अध्यक पंकज गुल्हाने म्हणाले की, अनेक पंचायत समित्यांमध्ये बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाने हा भेदभाव दूर करून नियमांनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली.----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी