
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.) | महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ महाआयटीच्या पोर्टलद्वारे राबविण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
सहकार विभागामार्फत जिल्ह्यातील १ लाख २४ हजार १४२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली असून, २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत ७६ हजार ९७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४६ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, अद्याप ३० हजार ५५५ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा (सेतू) केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे तसेच फार्मर आय डी नोंदणी असणे आवश्यक आहे. गावपातळीवरील यादीतील कर्जरक्कम आणि प्रत्यक्ष कर्जरक्कम यात तफावत दिसल्यास शेतकऱ्यांनी संभ्रमित होऊ नये.
आधार प्रमाणीकरणावेळी दिसणारी रक्कम शासन संबंधित बँकांना अदा करणार असून, उर्वरित रक्कम बँकेकडून माफ केली जाणार आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या थकबाकीपैकी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा संपूर्ण लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. नाव, खाते क्रमांक किंवा कर्जरकमेतील त्रुटी असल्यास पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी शाखांमध्ये शेतकरी सहायता कक्ष सुरू करून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी