
परभणी, ३ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.जिल्हास्तरीय नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पोलीस, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क तसेच डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अमली पदार्थांचा वापर हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून समाजाच्या आरोग्याशी संबंधित गंभीर आव्हान असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्हे, करण्यात आलेली जप्तीची कारवाई तसेच प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविणे, पानटपऱ्यांची नियमित तपासणी करणे आणि औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी औषध विक्री केंद्रांची काटेकोर पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
संशयास्पद प्रकरणांमध्ये पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे तातडीने कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा व महाविद्यालयांच्या आवारात तसेच १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तंबाखूजन्य पदार्थ, प्रतिबंधित वस्तू किंवा संशयास्पद विक्री आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कता, समन्वय आणि कठोर अंमलबजावणीवर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis