
बीड, 3 ऑगस्ट (हिं.स.) : बीड शहरातील चांदणेवाडा येथे गेल्या 44 वर्षांपासून सुरू असलेली साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी सार्वजनिक जयंती उत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या संकल्पनेतून आयोजित अण्णाभाऊ साठे गौरव महोत्सवात सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
महोत्सवाची सुरुवात समता सैनिक दलाच्या मानवंदनेने झाली. यावेळी सुमारे एक हजार महिलांनी पंचशील फेटा परिधान करून भव्य रॅलीत सहभाग घेतला. तसेच सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांविषयी जनजागृती करणारा ‘आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक न्याय रथ’ हा यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. संविधानिक संदेशांनी सजलेल्या या रथाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
अभिवादन सभेत बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचा ठराव मंजूर झाल्याची माहिती दिली. हा पुतळा लवकरात लवकर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही पुतळा उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्य शासनाकडे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली. संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होऊन वंचित समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आमदार विजयसिंह पंडित, बीड नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, प्रा. प्रदीप रोडे, भारत कांबळे, स्वप्नील गलधर, प्रेमलता चांदणे, ज्योतीताई मेटे, कल्याण आखाडे, सुशीलाताई मोराळे, अशोक लोढा, उत्तम पवार, सतीश कापसे, नाना मस्के, सुनिल पाटोळे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रचार करणारी भव्य साहित्य रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आयोजित अभिवादन सभेने झाली. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
चार दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेला हा महोत्सव सामाजिक परिवर्तन, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर करणारा उपक्रम म्हणून बीडच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात प्रेरणादायी परंपरा म्हणून ओळखला जात आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis