शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून जिल्हा बँकेकडून ई-केवायसीची सुविधा
परभणी, ३ ऑगस्ट (हिं.स.) : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळावा यासाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत बँकेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून जिल्हा बँकेकडून ई-केवायसीची सुविधा


परभणी, ३ ऑगस्ट (हिं.स.) : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळावा यासाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत बँकेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

ताडकळस शाखेचे अधिकारी तानाजी नवघरे यांनी पूर्णा तालुक्यातील लिमला येथील शेतकरी नामदेव ढगे यांच्या शेतावर जाऊन कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना बँक किंवा सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘बँक शेतकऱ्यांच्या बांधावर’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमाद्वारे बँकेचे अधिकारी व कर्मचारी थेट शेतात जाऊन ई-केवायसीसह बँकेच्या विविध योजनांची माहिती देत आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे.

बँकेच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचत असून, शासनाच्या योजनांचा लाभ अधिक जलदगतीने मिळण्यास मदत होत आहे. या लोकाभिमुख उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande