
ग्राम स्वराज कार्यशाळेत गैरहजेरीवरून संताप; कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर, ३ ऑगस्ट (हिं.स.) :छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आयोजित विकास आराखडा कार्यशाळेत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य या कार्यशाळेसाठी वेळेवर उपस्थित राहिले. मात्र, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारीच गैरहजर राहिल्याने कार्यशाळेचा उद्देशच अपूर्ण राहिल्याची भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे ग्राम विकासाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यशाळेवर परिणाम झाल्याची टीका करण्यात आली. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकप्रतिनिधींचा मौल्यवान वेळ वाया गेल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ग्राम स्वराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेतच अधिकारी उपस्थित नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis