सोलापूर जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या वितरणाला अद्यापही गती मिळालेली नसून, सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ९५३ शेतकऱ्यांना सुमारे ४६.४४ कोटी रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. ई-केवायसी
PIK Agri


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या वितरणाला अद्यापही गती मिळालेली नसून, सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ९५३ शेतकऱ्यांना सुमारे ४६.४४ कोटी रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्यांतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी यामुळे अनुदान वितरणाची प्रक्रिया रखडली आहे.

जिल्ह्यातील २० हजार ४६८ बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण ५७.५८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार २०४ शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ ९ हजार ४६८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११.१४ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे १ हजार ५४३ शेतकऱ्यांचे सुमारे ९.२३ कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही अडकून पडले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही विविध तांत्रिक कारणांमुळे मदत मिळालेली नाही.

तालुकानिहाय पाहता, मोहोळ तालुक्यात सर्वाधिक २ हजार ७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४.०५ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. याशिवाय करमाळा, माळशिरस, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांनाही अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही मोठ्या संख्येने पात्र शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, ई-केवायसी आणि बँक खात्यांतील त्रुटी तातडीने दूर करून उर्वरित अनुदानाचे वितरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande