कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाची 34.57 लाखांची फसवणूक
अमरावती, 3 ऑगस्ट : कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिला व युवतींना रोजगाराभिमुख नर्सिंग प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून शासनाची तब्बल 34 लाख 57 हजार 788 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वप्नील पांडे
शासनाची ३४ लाख ५७ हजारांनी फसवणूक


अमरावती, 3 ऑगस्ट : कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिला व युवतींना रोजगाराभिमुख नर्सिंग प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून शासनाची तब्बल 34 लाख 57 हजार 788 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वप्नील पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध येवदा पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, स्वप्नील पांडे यांनी ‘सत्य पुष्पांजली’ या नावाने प्रशिक्षण संस्था स्थापन करून नागपूर येथे मुख्यालय असल्याची कागदपत्रे शासनाकडे सादर केली होती. संस्थेला कौशल्य विकास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील लोतवाडा येथील स्व. बाळासाहेब काळे स्किल सेंटर येथे महिला व युवतींसाठी नर्सिंग प्रशिक्षण देण्यास मंजुरी मिळाली होती.

शासनाने संस्थेला 480 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यास परवानगी दिली होती. त्यापैकी 360 प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाल्याची नोंदही संस्थेने केली होती. हे प्रशिक्षण 16 जुलै 2025 ते 23 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार होते. मात्र प्रत्यक्षात वर्षभरात एकाही महिला किंवा युवतीला कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

महाविद्यालय प्रशासनाने याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर संस्थेने ऑनलाइन प्रशिक्षण झाल्याचे दर्शवून शासनाकडे प्रतिपूर्तीची देयके सादर केली आणि पहिल्या टप्प्यातील 34.57 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त केल्याचे उघड झाले.

या प्रकरणी उद्योग विभागाचे उपायुक्त दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे यांनी येवदा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार स्वप्नील पांडे, त्यांच्या सहकाऱ्यांसह संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर जिल्ह्यांतील व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात

प्राथमिक चौकशीत संबंधित संस्थेने केवळ अमरावतीतच नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही विविध संस्थांच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक अनियमितता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमरावतीच्या कौशल्य विकास विभागाने प्राथमिक चौकशी केल्यानंतर शासनाने द्विस्तरीय तपासणीचे आदेश दिले. या तपासात लोतवाडा केंद्रावर कोणतेही प्रशिक्षण न झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाखो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande