आरोपीची भररस्त्यात धिंड काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांना मानवी हक्क आयोगाची नोटीस
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। आरोपीची भररस्त्यात परेड काढून सार्वजनिकरित्या अपमान केल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पुणे शहराचे पोलीस आयुक्तांसह एकूण १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत आ
Pune Police


पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)। आरोपीची भररस्त्यात परेड काढून सार्वजनिकरित्या अपमान केल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पुणे शहराचे पोलीस आयुक्तांसह एकूण १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत आयोगाने स्पष्टीकरण मागविले आहे. मानवी हक्क संरक्षण कायद्यातील कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले का, याबाबत आयोगाने प्रश्न उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतान रेहमान शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याची भररस्त्यातून परेड काढण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कान पकडून उठाबशा काढण्यास आणि जाहीर माफी मागण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेविरोधात तानाजी प्रभाकर करचे आणि स्वप्नील जाधव यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीसोबत सादर करण्यात आलेले छायाचित्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आयोगाने खुलासा मागविला असून, त्यानंतर पुढील सुनावणीदरम्यान आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande